गडहिंग्लज (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा गडहिंग्लच्या कार्यकर्त्यांनी एक जानेवारी रोजी येथील श्रीमती गौरव्वा गुरूलिंग मोळदी या 75 वर्षाच्या महिलेचे जटानिर्मूलन करून नववर्षाचे केले अनोख्या पद्धतीने स्वागत. गडहिंग्लज येथील नदीवेस परिसरात राहणाऱ्या श्रीमती गौरव्वा मोळदी या वृध्द महिलेच्या डोक्यावर तीन वर्षांपूर्वी केसांचा गुंता तयार होऊन भल्या मोठ्या जटेचे ओझे तयार झाले. त्यामुळे त्यांना मान दुखीचा व पाठदुखीचा भयंकर त्रास होत होता. या त्रासातून त्यांना मुक्ती मिळावी म्हणून येथील राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून काम करणारे रामगोंडा उर्फ गुंडू पाटील यांनी पुढाकार घेऊन श्रीमती मोळदी यांचे प्रबोधन केले. अनिंसच्या शहर शाखेच्या कार्यकर्ते प्रा. सुभाष कोरे यांना त्यांनी संपर्क साधला आणि सदर वृद्ध महिलेच्या जटानिर्मूलनाचे आवाहन केले. प्रा. सुभाष कोरे यांनी राज्य कार्यकारणी सदस्य प्रकाश भोईटे, ज्येष्ठ साथी पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोक मोहिते यांच्या सहकार्याने श्रीमती गौरव्वा गुरुलिंग मोळदी यांना अखेर जटामुक्त केले आणि सन 2025 या नूतन वर्षाचे अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि स्वागत केले.
समाजात अजूनही रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा यांचा प्रचंड पगडा असून यातून सर्वसामान्य माणसांना होत असणारा त्रास हा असह्य असतो. तरीही केवळ अंधश्रद्धेपोटी ते सहन करीत असतात. अशाच या महिलेची या त्रासातून मुक्तता केली. यावेळी इंजिनीयर प्रज्ञा प्रकाश भोईटे, कु.अंजली मोळदी, मल्लिकार्जुन मोळदी, इत्यादी उपस्थित होते. या उपक्रमाचे नववर्षाच्या बरोबरीनेच सर्वत्र स्वागत होत आहे.