
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर हे महापराक्रमी व प्रतापी महापुरुष होते. प्रत्येक रणसंग्रामात शत्रू सैन्याला झोडपून काढणारे प्रतापराव म्हणजे एक झंजावात वादळ होते. स्वराज्याची दीर्घकाळनिष्ठेने सेवा करणाऱ्या प्रतापरावांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ बांधलेल्या नेसरी जवळील स्मारकाची व त्या परिसराची नवीन वर्षाच्या निमित्ताने अनिंसच्या गडहिंग्लज शहर शाखा व नेसरी शाखेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता करण्यात आली. छत्रपती शिवरायांचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांचे भव्य स्मारक तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नामदार बाबासाहेब कुपेकर यांच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन 2009 साली बांधण्यात आले आहे. तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री नामदार शरदचंद्र पवार, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री नामदार जयंत पाटील व अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मारकाचे लोकार्पण झाले. पंधरा वर्षाच्या काळात या स्मारकाला भेट देण्यासाठी अनेक इतिहास प्रेमी, साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत, शाळा, महाविद्यालये, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. पण स्मारकाच्या ठिकाणी कायमस्वरूपी एक-दोन सेवक शासनाच्या वतीने नेमून देखभाल करण्याची गरज आहे. शासनाची अनास्था आहे. मात्र अनिंसच्या गडहिंग्लज व नेसरी शाखेच्या कार्यकर्त्यांनी आज रोजी नवीन वर्षानिमित्त स्वच्छता मोहीम राबवली व संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी अनिंसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुभाष कोरे, सूर्यकांत देसाई, अमर सासुलकर, सुरेश मटकर, जोतिबा निचळ सर, अनिकेत नाईक, महादेव करडे, अमर कोरे, वसंत पाटील, पांडुरंग करंबळकर गुरुजी, प्रज्ञा भोईटे इत्यादी कार्यकर्त्यांनी ही स्वच्छता मोहीम यशस्वी केली. कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta