
गडहिंग्लज : देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे. आणि मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केले आहे. महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम 2005 नुसार देवाला देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणे किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरीपण गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी परिसरातील एका दलित वसाहतीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या युवकाला त्याच्या आजारपणातून मुक्तता मिळावी म्हणून विधिवत यल्लमा देवीला जोगता म्हणून सोडण्याचा नियोजित आणि अत्यंत हिडीस प्रकार अनिंसच्या गडहिंग्लज शहर व नेसरी शाखेच्या जागरूक कार्यकर्त्यांनी, नेसरी येथील पोलिसांच्या सहकार्याने हाणून पाडला. याबाबत अधिक माहिती अशी की नेसरी परिसरातील दलित वसाहती मधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण काही महिन्यांपासून मान दुखी व अन्य काही शारीरिक व्याधीने ग्रस्त होता. या व्याधीपासून त्याला मुक्तता मिळावी म्हणून काही डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. पण दुखणे काही कमी झाले नाही परिणामी तो तरुण व त्याचे कुटुंबीय खूप त्रस्त झाले, खचू लागले याच दरम्यानच्या काळात या कुटुंबीयांना काही देवरसपण करणारे, गंडेदोरे देणारे, अंगारे धुपारेच्या माऱ्याने व्याधीमुक्त करतो असं सांगून भिती घालणारे काही भोंदू बाया ,बापे भेटले. त्यांनी हा व्याधीग्रस्त युवक म्हणजे यल्लामा देवीचे झाड आहे .देवीला ते आवडलेले आहे त्यामुळे त्याला देवीच्या सेवेसाठी ,जोगता म्हणून सोडायला पाहिजे अशी भीती घातली. आणि घाबरलेल्या या दलित कुटुंबाने त्या भोंदू देवरस पण करणाऱ्यांचे विचार ग्राह्य मानून आपल्या या तरुण मुलाला जोगता म्हणून सोडायची तयारी केली.याची माहीती अनिंस कार्यकर्त्यांना मिळाली. त्या युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होईल याची जाणीवही त्या कुटुंबाला झाली नाही. केवळ अंधश्रद्धेतून त्या युवकाच्या आयुष्याची माती झाली असती; पण त्यांचे प्रबोधन आनिंसच्या जागरूक कार्यकर्त्यांनी केले आणि त्या युवकाला आणि कुटुंबाला या अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढले. यासाठी नेसरी पोलिसांचे बहुमोल सहकार्य लाभले. यासाठी अनिंसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे, सूर्यकांत देसाई ,रवी हीडदुगी, अमर कोरे, टीबी कांबळे, आप्पा गुरव, इंजिनीयर प्रज्ञा भोईटे, नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे ए.एस.आय शिवाजी पाटील हवालदार सागर कांबळे, पांडुरंग करंबळकर गुरुजी या सर्वांनी त्या कुटुंबाचे व त्या युवकाचे कौन्सिलिंग करून यातून सुटका केली आणि त्या युवकाला या सर्वातून मुक्त केले व चांगले वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला.

Belgaum Varta Belgaum Varta