
गडहिंग्लज : शिक्षण क्षेत्रावर चहू बाजूने हल्ले होत असून आपण जर असेच गप्प राहिलो तर नजीकच्या काळात शिक्षण घेणे ही केवळ श्रीमंत लोकांसाठी राखीव गोष्ट राहील आणि समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थी शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहतील अशी भीती प्रा. आनंद मेणसे यांनी बोलताना व्यक्त केली. ते गडिंग्लज येथील शारदा भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलत होते. प्रा. सुभाष कोरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रा. कोरे यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रांनी लिहिलेल्या ‘विवेकनिष्ठ साथी’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. मेणसे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. कोरे सौ. प्रेमा कोरे यांचा यावेळी मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या भाषणात बोलतांना प्रा. आनंद मेणसे पुढे म्हणाले की, प्रा. सुभाष कोरे आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले. त्यावेळचे संस्थाचालकही अतिशय चांगले असल्यामुळे अशा गरीब विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळेच त्यांचा विकास होऊ शकला. या मंडळींनी अतिशय तळमळीने शिक्षण देण्याचे काम हयातभर केले. त्यामुळे समाजात चांगले विद्यार्थी निर्माण होऊ शकले. आज जी एकूणच परिस्थिती निर्माण झाली आहे ती ध्यानात घेता डोळ्यासमोर येणारे चित्र अत्यंत भयावह आहे. शिक्षणाचे खाजगीकरण करण्यावर सरकार ठाम असून त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. मात्र समाजातील शिक्षक प्राध्यापक पालक यांनी संघटितपणे या विरोधात आवाज उठवण्यास हवा. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी आपण शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध करायला पाहिजे.
ते पुढे असे म्हणाले की, शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढत जाईल तस तशा अंधश्रद्धा नाहीशा होऊ लागतील पण दुर्दैवाने तसे झालेले मात्र दिसत नाही. समाजात शिक्षणाचा प्रसार होत असला तरीही अंधश्रद्धा मात्र तशाच असून किंबहुना त्या वाढीस लागल्या आहेत कुंभमेळ्याला होणारी गर्दी काय दर्शविते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यासाठीच समाजात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ कॉ. संपत देसाई बोलतांना म्हणाले की, सुभाष कोरे हे आपले वर्गमित्र होते. एक शिस्तबद्ध विद्यार्थी म्हणून ते विद्यार्थी वर्गात ओळखले जात. आणि त्यामुळे ते प्रगती करू शकले. निवृत्तीनंतर त्यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन समितीला एक सच्चा कार्यकर्ता मिळालेला आहे निश्चितपणे पुढील काळात त्यांच्याकडून भरीव कामगिरी अपेक्षित आहे. प्रसिद्ध कवी प्रा. एकनाथ पाटील यांनी विद्यार्थी जीवनात शिवाजी विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील एकत्र राहताना आलेले अनेक अनुभव कथन केले. यावेळी आपण सगळेच आर्थिक अडचणींचा सामना करत प्रवास करत होतो आणि एकमेकाला मदत करीत शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला. आमचे मार्ग वेगवेगळे झाले तरी मैत्री आजही टिकून आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या सभेत प्रा. सुभाष कोरे यांच्याबद्दल हेमंत पाटील, विनोद मिरगुले, पुंडलिक रक्ताळे, प्राध्यापक प्रकाश, प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. सुनील शिंत्रे, अंजनाताई रेडेकर यांनी व इतर मित्रांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना सुभाष कोरे यांनी उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानले संपादक मंडळ, प्रकाशक यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. याप्रसंगी त्यांच्या पत्नी सौ. प्रेमा कोरे, कन्या सृजन कोरे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या समारंभात सुरुवातीला प्रा. कोरे यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन दत्ता देशपांडे व प्रा. अश्विनी पाटील यांनी केले. यावेळी त्यांच्या मातोश्री सीरमाबाई कोरे यांचाही गौरव करण्यात आला. त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकवलेला गुरुजनांचाही त्यांच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषण ऍड. विकासअण्णा पाटील यांनी केले.सुरेश पोवार यांनी सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक केले तर शेवटी आभार सौ. प्रेमा कोरे यांनी व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी पाटील व सुरेश दास यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta