कारण अस्पष्ट, परिसरात उलटसुलट चर्चा
तेऊरवाडी (एस के पाटील) : नेसरी पासून जवळ असणाऱ्या वाघराळी (ता. गडहिंग्लज) येथील केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिधू तुकाराम सुतार (वय. ७०) त्यांची पत्नी बायाक्का सिधू सुतार (वय. ६५) या वृद्ध दाम्पत्याचे दोन स्वतंत्र खोलीत मृतदेह आढळून आल्याने नेसरी परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची फिर्याद नातेवाईक दिपक धोंडीबा लोहार (वय ३६) यांनी नेसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. वृद्ध दाम्पत्याचा खून की आत्महत्या? हे कारण अस्पष्ट आहे. नेसरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून पोलीस तपास व शवविच्छेदन रिपोर्ट हाती आल्यानंतर याचे कारण स्पष्ट होईल. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सुतार यांचे सावंत गल्लीमध्ये भरवस्तीत घर आहे. गुरूवारी (ता. ३) रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास सुतार यांच्या घरचा समोरील दरवाजा उघडा होता. शेजाऱ्यांना संशय आल्याने याची माहिती नातेवाईक, पोलीस पाटील व नेसरी पोलीसाना दिली. बायाक्का यांचा किचनमध्ये तर सिधू यांचा बेडवर मृतदेह आढळून आला. सदर घटनेची नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होती. घरातील किमती ऐवज लंपास झाला असल्याचा संशय व्यक्त होतो आहे. घरातील काही वस्तु अस्त्याव्यस्त पडल्या होत्या. चोरीच्या उद्देशातून खून की अंतर्गत कारणावरुन आत्महत्या हे पोलीस तपासातून निष्पन्न होईल. सुतार यांनी बुधवारी बँकेतून पैसे काढल्याचे घटनास्थळी चर्चा होती. तसेच ते इतर गरजूना सतत पैशांची मदतही करत असायचे. त्यामुळे कोणी चोरीच्या उद्देशातून पाळत ठेवून घातपात केला आहे काय? याचाही पोलीस तपास सुरू आहे. आजूबाजूच्या गावातील नागरिकांना घटना समजताच सुतार यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती. सुतार पती-पत्नी दोघेच घरी राहात होते. त्यांना दोन मुले आहेत. मुलगा अविवाहित असून मुंबई येथे नोकरी करतो आहे. मुलगीचे लग्न झाले आहे. घरी दोघे राहत असल्यामुळे पोलीसांचा त्यादृष्टीने तपास सुरू आहे. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे करत आहेत.