खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता. खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित घोडे, हत्ती, उंट याच्यासह ३५० कलाकारांनी सादर करण्यात येणारे शिवगर्जना एतिहासिक नाट्य श्री महलक्ष्मी ग्रूप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या पटांगणावर येत्या दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत असे चार दिवस तालुक्यातील जनतेला मोफत नाट्य पाहण्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व लैला शुगर्सचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी लैला शुगर्सचे एम डी सदानंद पाटील यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले.
यावेळी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल पटांगणावर दोन भागात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिल्यांदा दि. ५ जानेवारी व ६ जानेवारी रोजी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन होणार आहे. तर दि. ७ जानेवारी ते १० जानेवारी पर्यंत शिवगर्जना नाट्यप्रयोग होणार आहे.
शिवगर्जना नाट्य प्रयोगाचे उद्घाटन भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या हस्ते होणार आहे. शिवगर्जना नाट्य प्रयोग पाहण्यासाठी जवळपास १४ हजार नाट्य रसिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
या नाट्य प्रयोगात स्थानिक कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला श्री. महालक्ष्मी ग्रुपचे संचालक विठ्ठल करंबळकर, चांगाप्पा निलजकर, महादेव बांदिवडेकर, यल्लापा तिरवीर, बाळ गौडा पाटील, नारायण हलगेकर, नागेश जोगोजी, जनरल सेक्रेटरी तुकाराम हुंदरे, राजू करंबळकर, भरमाणी पाटील, कर्मचारी तसेच शिवगर्जना नाट्य प्रयोगाचे दिग्दर्शक स्वप्नील यादव, त्याचे सहकारी तसेच अभिजीत कालेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta