खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायत अध्यक्षावर अविश्वासाचा ठराव मंजुर झाल्यानंतर अध्यक्ष पद रिक्त झाले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी दि. २९ रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गुरुवारी दि. २९ रोजी नंदगड ग्राम पंचायतीच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडा एगनगौडर यांच्या अधिकाराखाली निवडणूक घेण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, माजी अध्यक्षा विद्या मादार यांच्यावर गेल्या महिन्यात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नंदगड ग्रामपंचायती अध्यक्ष पदाची जागा रिक्त झाली. लागलीच नंदगड ग्रामपंचायती अध्यक्ष पद येत्या २ जानेवारीच्या आधी निवड करावी अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्याअनुषंगाने दि. २९ रोजी नंदगड ग्रामपंचायती अध्यक्ष पदाची निवडणुक प्रक्रिया पार पाडली.
नंदगड ग्रामपंचायतीत २३ सदस्य असुन महिलांची संख्या अधिक असल्याने महिलाना अध्यक्षाचा मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अशिया सय्यद व निर्मला जोडगी यांनी अर्ज दाखल केले. यावेळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आशिया सय्यद यांनी अर्ज मागे घेतला. व निर्मला जोडगी यांची अध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवड झाली.
यावेळी सदस्यांनी पुष्पहार घालून नुतन अध्यक्षा निर्मला जोडगी यांचे अभिनंदन केले.