खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक लावण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
युवा समितीच्या पदाधिकार्यांनी गेल्या काही दिवसांपासून बेळगाव ते खानापूरपर्यंतच्या रस्त्यावर कन्नड व इंग्रजीसह मराठी भाषेतून फलक लावावेत यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेळगाव येथील कार्यालयाला व भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहाय्यक आयुक्य एस. शिवकुमार यांना निवेदन देऊन या मागणीकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर भाषिक अल्पसंख्यांक आयोगातर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला पत्र पाठवून मराठीतील फलक लावण्याची सूचना केले होती.
त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या रवी करलिंगण्णावर यांनी धारवाड येथील कार्यालयात संपर्क साधा अशी सूचना केली होती. त्यानुसार युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, ज्ञानेश्वर सनदी आदींनी प्रकल्प संचालक पोतदार यांच्याशी चर्चा केली.
यावेळी अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बेळगाव ते अनमोड पर्यंतच्या रस्त्यावरील सर्व गावे मराठी भाषिक असून कन्नड व इंग्रजी भाषेतील फलक लावल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे तिन्ही भाषेतून फलक लावले तर नागरिकांची अडचण दूर होणार आहे. भाषिक अल्पसंख्याक आयोगाने पत्र पाठवून महामार्ग प्राधिकरणाला अशी सूचना केली आहे. याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मराठी भाषेतील फलक लावावेत अशी मागणी केली. तसेच फलक लावले नाहीत तर युवा समिति स्वत:हून फलक लावण्यासाठी पुढाकार घेईल, असे सांगितले. यावेळी पोतदार यांनी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल आश्वासन दिले.
काही दिवसांपूर्वी खानापूर ते रामनगरच्या रस्त्याबद्दल खानापूर युवा समितीतर्फे आवाज उठवण्यात आला होता. तसेच याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत फोटो व निवेदन पाठवण्यात आले होते.
याबाबत पोतदार यांनी तुम्ही पाठवलेल्या निवेदनाची माहिती असून वनखात्याने न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे काम प्रलंबित होते. मात्र आता काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती दिली. त्यामुळे युवा समितीच्या आंदोलनाला यश आल्याचे दिसून येत आहे.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …