खानापूर : शेजारच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील चोर्ला राज्यमार्गावरील कणकुंबीत चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. चोलामार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अथवा कोरोना लसीकरण झाल्याचा दाखला दाखविणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
गेल्या आठवडाभरापासून खानापूर तालुक्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित असलेल्या तालुक्याला तिसऱ्या लाटेचा कोणताही धोका उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कणकुंबी येथे परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी 24 तास कार्यरत चेकपोस्ट उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दिवस-रात्र पोलीस, महसूल व आरोग्य खात्याचे कर्मचारी तैनात राहणार आहेत.
बस, दुचाकी, चारचाकी या सर्व वाहनातून येणाऱ्या प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी व चौकशीला सामोरे जावे लागत आहे. आशा कार्यकर्त्यांकडून थर्मल स्क्रीनिंग केले जात आहे. तर अहवाल तपासणीसाठी महसूल विभागाचे तलाठी कार्यरत आहेत.
