खानापूर : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे जनजागृती दौरा करण्यात आला.
एकी प्रक्रियेला यशप्राप्ती झाल्यानंतरच्या पहिल्या जनजागृती दौऱ्याची सुरवात हब्बनहट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली जांबोटी येथे 17 जानेवारी हुतात्मा दिनाची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर नंदगड, हलशी, कारलगा, शिवोली, चापगाव, कुप्पटगिरी येथे जनजागृती करण्यात आली व हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे, समितीचे ज्येष्ठ नेते माजी सभापती मारुती परमेकर, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील, ब्रह्मानंद पाटील, निरंजन सरदेसाई, लक्ष्मण कसरलेकर, रवींद्र शिंदे, तसेच ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.