खानापूर : खानापूर तालुक्यातील लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीकडून रेशन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला चांगलेच धारेवर धरल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
लक्केबैल गावातील पीकेपीएस सोसायटीला ग्रामस्थांना रेशन वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीकडून लक्केबैल पीकेपीएसला रेशन पुरविण्यात येते. मात्र ग्रामस्थांना पीकेपीएसकडून सरकारनं ठरवून दिलेल्या प्रमाणात समर्पक रेशन पुरवठा केला जात नाही, सर्व पात्र ग्रामस्थांना रेशन कार्डांचे वाटप केले नसल्याचा आरोप करून आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी संचालक मंडळ सदस्य आणि सचिवाला धारेवर धरले. यावेळी ग्रामस्थांनी पीकेपीएसच्या अनागोंदी कारभाराबाबत संबंधितांना जाब विचारला. ग्रामस्थांच्या तक्रारींवर आणि आरोपांवर संचालक आणि सचिवांना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. सचिव प्रकाश पाटील यांनी थातुर मातुर उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी त्यांना फैलावर घेतले. संदीप सनदी यांच्यासह ग्रामस्थांनी पीकेपीएसच्या अनागोंदी कारभारावर ताशेरे ओढले. मापात पाप करून वजनात काटामारी करत कमी रेशन दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अजूनही आणखी ८४ पात्र ग्रामस्थांना रेशन कार्डे का दिली नाहीत असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी यावेळी केला.
या बैठकीला ग्रामस्थांनी खानापूर तहसीलदार, अन्न निरीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनाही पाचारण केले होते. त्यापैकी केवळ अन्न निरीक्षकच उपस्थित होत्या. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यावर ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोषींवर तातडीने कारवाई करून अटक करण्याची मागणी केली. याच दरम्यान, पीकेपीएसकडून रेशन वाटप करण्यासाठी नेमलेला कर्मचारी भ्रष्टाचारात साथ देत नसल्यावरून त्याला काढून टाकून नव्या दुसऱ्या कर्मचाऱ्याला नेमण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली. पूर्वीच्या कर्मचाऱ्यानेही यावेळी आपला ६ महिन्यांचा पगार न देता कामावरून काढून टाकले असल्याचा आरोप केला. त्यावरही पीकेपीएस सचिवाला समर्पक उत्तर देता आले नाही. लक्केबैल पीकेपीएसच्या रेशन वाटपातील भ्रष्टाचाराबाबत ग्रामस्थांनी खानापूर तहसीलदार, उपतहसीलदार, अन्न निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि संबंधितांना तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची पुरेशी दखल घेतली जात नसल्याने नाराज झालेल्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन पीकेपीएस संचालक आणि सचिवाला धारेवर धरले. पुराव्यादाखल या बैठकीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. किमान आता तरी मायबाप सरकारने जागे होऊन लक्केबैल पीकेपीएसच्या रेशन वाटपातील भ्रष्टाचाराची निःपक्ष चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.