
जांबोटी येथील प्रचार सभेत इशारा
खानापूर : गेल्या ६८ वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून अत्याचार होत आहे. तरीही मराठी भाषिकांनी आपल्या मायमराठीच्या राज्यात जाण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थानिक नेते मराठी भाषिकांचे खच्चीकरण करीत आले आहेत. पण, यापुढे त्यांची दंडेलशाही सहन केली जाणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहीत पाटील यांनी दिला.
जांबोटी येथे मंगळवारी म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ रॅली आणि प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना रोहीत पाटील म्हणाले, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी सीमावासीयांनी शर्थ चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. यापुढे सीमावासीयांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सीमावासीयांच्या बाजुने ठोस भूमिका घेईल. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी जांबोटी भागाने नेहमीच सीमाप्रश्नी साथ दिली आहे. आणीबाणीच्या वेळी जांबोटी भागातील मराठी भाषिकांनीच समितीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. सध्या राष्ट्रीय पक्षांनी अनेक अमिषे दाखवून मराठी भाषिकांना आपल्या वळचणीला बांधण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, या भागातील जनता स्वाभिमानी असून ती कोणत्याची अमिषाला बळी पडणार नाही, अशी आपेक्षा व्यक्त केली. यावेळी रोहीत पाटील यांनी मुरलीधर पाटील यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी जांबोटी आणि रामापूर पेठेतून रॅली काढून मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या. जांबोटीसह विविध गावातील नागरिकांनी यावेळी स्वयंसस्फुर्तीने रॅलीत सहभाग घेत मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यानंतर झालेल्या सभेलाही मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे जांबोटी भागावर दावा करणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सभेला अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी जि.पं. सदस्य जयराम देसाई, विलास बेळगावकर, आबासाहेब दळवी यांच्यासह जांबोटी भागातील नेते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta