खानापूर : खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर सोमवारी दि.२९ रोजी दुपारी ३ वाजता खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आखिल भारतीय पातळीवरील १५ व्या वर्षीच्या कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
या आखाड्याची सध्या जोरदार तयारी सुरू असुन आखाड्याचे उदघाटन नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर आखाड्याचे पूजन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. विविध फोटोचे पुजन भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला साखर कारखान्याचे एम. डी. सदानंद पाटील, माजी भाजपा तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते होणार आहे.
यावेळी बोलताना खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण बामणे (उचवडे) म्हणाले की, नुतन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त हा कुस्ती आखाडा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने माजी आमदार अरविंद पाटील व भाजपचे तालुका पदाधिकारी याचे मार्गदर्शन राहणार आहे. या कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती पै सिकंदर विरूद्ध पै विशाल भोंडू यांच्यात होणार आहे. तर दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै सुनिल फडतरे मुधोळ विरूद्ध पै संदीप मोटे यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै कार्तिक काटे विरूद्ध पै लक्ष्मण डागर यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती पै संगमेश बिराजदार विरूद्ध पै शरद पवार यांच्यात होणार आहे. याशिवाय मेंढ्यांची कुस्ती पै प्रशांत चापगांव विरूद्ध पै महेश तिर्थकुंडे याच्यात होणार आहे. याचबरोबर एकूण ५२ कुस्त्या होणार आहे, अशी माहिती दिली.
यावेळी कुस्ती संघटनेचे सेक्रेटरी शंकर पाटील, यशवंत आल्लोळकर, पांडुरंग पाटील, प्रकाश मजगावी, राजाराम गुरव, मल्लापा मारीहाळ, सदानंद होसुरकर, लक्ष्मण झांजरे, मारूती पाटील, अमोल बेळगावकर, विठ्ठल आडकुरकर, रामचंद्र पाटील व इतर कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.