शिक्षणमंत्र्यांची घेतली भेट
खानापूर : खानापूर तालुक्यातील मुला- मुलींच्या शिक्षणाचा सरकारी शाळाच प्रमुख आधार आहेत. ग्रामीण भागात तर शेतकरी व गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची भिस्त पूर्णपणे सरकारी शाळांवर अवलंबून आहे. या शाळांना पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केली. बंगळूर येथे त्यांनी शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा यांची भेट घेऊन तालुक्यातील शैक्षणिक परिस्थितीची माहिती दिली.
तालुक्यात पाचशेहून अधिक शिक्षकांची कमतरता आहे. अनेक शाळांना पुरेसे शिक्षक नसल्याने नियोजन बदली करून तर काही ठिकाणी अतिथी शिक्षक देऊन शिक्षणाचा गाडा हाकावा लागत आहे. यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कठीण ठरले असून त्याचा शैक्षणिक विकासावर परिणाम होत आहे. शैक्षणिक सुविधांनी मागास असलेल्या तालुक्यात शिक्षक, शाळा आणि शैक्षणिक सुविधा पुरवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली. अधिवेशनानंतर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन बंगारप्पा यांनी दिले.