खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी निवडीचा तिढा अधिक गुंतताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत मराठी माणसाचे पुरते पानिपत झाले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. हा पराभव मराठी माणसाच्या जिव्हारी लागणारा होता. निवडणुकीनंतर चिंतन बैठक बोलावणे गरजेचे होते मात्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक बोलविण्याचे सोईस्कररित्या टाळले. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव चिंतन बैठक बोलाविण्यात आली. 16 जून रोजी झालेल्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचा राजीनामा मागितला व पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यानुसार काही पदाधिकाऱ्यांनी स्वच्छेने तर काहींना कार्यकर्त्यांच्या दबावामुळे राजीनामे द्यावे लागले. कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे यांनी तर आपली नैतिक जबाबदारी स्वीकारली व आपला राजीनामा देत भविष्यात समितीच्या कोणत्याही पदावर न राहता सीमालढ्यात आग्रही राहू अशी घोषणा केली. त्यानंतर बैठकीत नवीन पदाधिकारी निवडीबाबत चर्चा होऊन नवीन पदाधिकारी निवडीसाठी खानापूर समितीतील दोन ज्येष्ठ नेते माजी आमदार दिगंबर पाटील व माजी सभापती मारुती परमेकर यांची निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली व नवीन पदाधिकारी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी पुन्हा 4 जुलै रोजी बैठक बोलाविण्यात आली. मात्र मागील बैठकीत ज्यांनी पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागितले होते त्यांनी जणू भाकरीच फिरवली आणि या पदाधिकाऱ्यांना संघटना मजबूत करण्यासाठी वेळच मिळाला नाही, त्यांना अजून एक संधी देण्यात यावी असे वक्तव्य केले. 16 जूनच्या बैठकीत आक्रमक झालेला कार्यकर्ता आज इतका मवाळ कसा झाला असा प्रश्न निष्ठावंत मराठी भाषिकांना पडला आहे.
खानापूर समितीची एकी झाल्यानंतर गोपाळराव देसाई यांनी अध्यक्षपदी तर यशवंतराव बिर्जे यांची कार्याध्यक्ष पदी निवड झाली होती त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात विधानसभा निवडणुका लागल्या. त्यांना संघटना मजबूत करण्यासाठी किंवा जनतेपर्यंत पोचण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असे काहीसे सूर आता उमटू लागले आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी देखील सरचिटणीस व कार्याध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषविली होती. त्यावेळी या नेत्यांनी संघटना मजबूत केली नव्हती का? समिती विषयी जनजागृती केली नव्हती का? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आल्याशिवाय रहात नाही.
दरम्यान निमंत्रक म्हणून नियुक्त केलेले समितीचे ज्येष्ठ नेते आता नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. संघटना जर मजबूत करायची असेल तर बदल हे झालेच पाहिजेत अश्या आग्रही भूमिकेत तालुक्यातील जनता आहे.