
खानापूर : खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मलप्रभा नदीसह नाले, तलाव दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याच्या प्रवाहामुळे बंद झाले आहेत. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे हालगा ग्राम पंचायत हद्दीतील मेरडा -करजगी रस्त्यावरील मोठा तलाव काठोकाठ भरून ओसंडत असताना तलावाचा मोठा बांध फुटला जात असल्याची घटना हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील (मेरडा) यांच्या नजरेस आली.
वेळेचा विलंब न लावता लागलीच ग्राम पंचायतीच्या कर्मचारी वर्गाला घेऊन व सोबत टिप्पर घेऊन मेरडा- करजगी रस्त्यावरील भरमा तलावाचा बांध वाचविण्यासाठी हजर झाले व बघता, बघता तलावाच्या बांधावर टिप्परच्या सहाय्याने भराव घालुन फुटणारा बांध वाचविला. त्यामुळे तलावाच्या खालील २०० एकर भात जमिनीतील भात सुरक्षित राहिले. जर तलावाचा बांध फुटला असता तर २०० एकर जमिनीतील भात जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.
मेरडा- करजगी रस्त्यावरील तलावामुळे या भागातील २०० एकर जमिन ओलिताखाली येते. या २०० एकर जमिनीला या तलावाचे पाणी मिळते. या तलावाचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो.
नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे मेरडा करजगी रस्त्यावरील तलावाच बांध वाचविण्याचे काम नवनिर्वाचित हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील (मेरडा) यांनी केल्याने त्यांच्या कार्याचे हलगा ग्राम पंचायतीच्या क्षेत्रातील गावातुन कौतुक होत आहे.
ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील हे नेहमीच समाज कार्यासाठी स्वतःला वाहुन घेतात. त्यांनी यापूर्वी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्याचबरोबर हलगा ग्राम पंचायतीला यापूर्वी पुरस्कार मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta