खानापूर : खानापूर तालुक्यातील हलगा या ठिकाणी गेल्या 1978 पासून स्थायिक असलेले पूज्य श्री गोपाळ महाराज यांचे गुरुवारी दुपारी 12 च्या सुमारास दुःखद निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून ते शारीरिक आजारामुळे त्रस्त होते. त्यांना बेळगाव केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पूज्य श्री गोपाळ महाराज हलगा हे मूळचे पंजाब लुधियाना येथील ते काही वर्षांपासून दांडेली येथील पेपर मिल मध्ये सेवा करत करता त्यांनी स्वतःला हंडीभडंगनाथ या ठिकाणी वाहून घेतले. तेथील गुरूंच्या आदेशानुसार त्यांनी हलगा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून एक झोपडी बांधून त्या ठिकाणी जनसेवेला सुरुवात केली. गोपाळ महाराज या भागातील एक दैवतच होते. त्यांनी अनेक भक्तांचा मोठा समुदाय उभारला आहे. हलगा गाव परिसरात मंदिरांच्या उभारण्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. येथील कलमेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, मरेवा मंदिर उभारणीत सिंहाचा वाटा तर राम मंदिर, गणेश मंदिरच्या उभारणीमध्ये मोठे आर्थिक सहाय्य त्यांनी केले आहे. शिवाय गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात पाच साड्या, जेवणाचा अर्धा खर्च, उपवर मुलींच्या साठी शिलाई मशीन, शाळांना भांडी देण्यासाठी त्यांनी कधी मागे राहिले नाहीत. खानापूर तालुक्यातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी समाजप्रबोधनासाठी त्यांचे आशीर्वाद नेहमी कायम असायचे. त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून अनेक सिनेनट, राजकीय व्यक्ती नेहमी येत असायचे. त्यांचे गुप्तदर्शन व त्यांचा आशीर्वाद घेऊन जात असत. ते एक अन्नदाता होते. त्यांच्या मठावर गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधीही उपाशी पाठवले नाही हा एक त्यांचा पायंडा होता. गेल्या काही दिवसापासून ते वयोमानानुसार शारीरिक आजारातून त्रस्त होते. त्यामुळे त्यांना बेळगाव येथे केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करता करता त्यांची हृदयविकाराने प्राणज्योत मावळली. त्यांच्यावर उद्या शुक्रवारी हलगा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.