
खानापूर : 1 नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळण्याचे आवाहन खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांत रचना करून 1 नोव्हेंबर 1956 रोजी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आदी बहुसंख्य मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रापासून अलग करून अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आल्यामुळे बहुसंख्य मराठी भाषिकावर अन्याय झाला आहे. गेल्या 67 वर्षापासून सीमाभागातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे परंतु कर्नाटक सरकार गेल्या 67 वर्षापासून आपल्या घटनात्मक न्याय हक्कासाठी लढणाऱ्या मराठी जनतेवर अनेक अत्याचार करून मराठी भाषिकांची मागणी पायदळी तुडवीत आहे. कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती संपवण्याचा चंग बांधला आहे. मात्र येथील मराठी भाषिक जनतेची महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा अद्यापही कायम असून सीमाभागातील मराठी जनता दरवर्षी बेळगावसह सीमाभागात 1 नोव्हेंबर या दिवशी काळा दिन पाळून सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त करते. यावर्षी देखील 1 नोव्हेंबर या काळ्या दिनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने रविवारी खानापूरात पत्रकांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली व काळादिन गांभीर्याने पाळण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, शहर उपाध्यक्ष मारुती गुरव, उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, खजिनदार संजय पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत, गोपाळराव पाटील, प्रकाश चव्हाण, नारायण (पप्पू) पाटील, शिवाजी पाटील, म्हात्रु धबाले, मष्णू धबाले, शिवाजी क.पाटील, भरत ह. पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta