खानापूर : मुलींच्या व महिलांच्या फोटोंशी छेडछाड करून इंस्टाग्रामवर अपलोड करून अश्लील कृत्य व बदनामी करणारा लोकोळी गावातील आरोपी मंथन दशरथ पाटील याला ताबडतोब अटक करून त्याला कारागृहात पाठविण्यात यावेत व त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी लोकोळी गावातील 150 पेक्षा जास्त युवती, महिला व नागरिकांनी खानापूर पोलीस स्थानकावर मोर्चा काढला. त्यामुळे थोडा काळ वातावरण तंग झाले होते.
महिला नेत्या जयश्री पाटील, भरमानी पाटील, लोकोळी ग्रामस्थांनी पीएसआय गिरीश एम. यांच्या बरोबर चर्चा केली. व आरोपीला अटक केल्याशिवाय येथून मागे हटणार नाही, अशी कडक भूमिका घेतली. त्यामुळे पोलीसांनी ताबडतोब सुत्रे हलवून सदर आरोपीला ताब्यात घेतले. परंतु पोलिसांनी मंथन दशरथ पाटील याच्यावर विनयभंगाचा व इतर गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी दुसरे साधे गुन्हे दाखल केले असल्याचे सांगत जयश्री पाटील, प्रिया पाटील, अर्चना पाटील, अनिता पाटील, अनिता माने, श्रीमंती पाटील, सुनिता चव्हाण, नम्रता चव्हाण, संगीता पाटील आदी महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
आरोपीवर विनयभंगाचा व इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावेत व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावीत या मागणीसाठी लोकोळी ग्रामस्थ व महिला सोमवारी बेळगावला जाऊन जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे समजते.
यावेळी अनंत पाटील, तुकाराम चव्हाण, विठ्ठल पाटील, रामचंद्र पाटील, संतोष पाटील, बाळकृष्ण पाटील, मारुती गुरव, प्रवीण चव्हाण, ईश्वर चव्हाण, प्रथमेश पाटील, तसेच लोकोळी गावातील ग्रामस्थ महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta