खानापूर : राज्यात सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबवत आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्या दिवशी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपाचे राज्यसभा सदस्य व रयत मोर्चाचे राज्य अध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी खानापूर येथील बांधकाम खात्याच्या विश्रामधामात बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला असून राज्यातील 236 तालुक्यांपैकी 233 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने घोषणा केली आहे. परंतु शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच काँग्रेस सरकार शेतकऱ्यांना फक्त दोन तास वीज पुरवठा देत आहे. त्याच्यात पण लोडशेडिंग होत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. राज्य सरकारने काल 7 तास वीज पुरवठा करतो म्हणून घोषणा केली आहे. परंतु त्याची पूर्तता सरकार करणार की फक्त घोषणाच राहणार हे पहावे लागेल. यापुढे शेतकऱ्यांना विद्युत पंपसाठी विद्युत जोडणी व ट्रान्सफॉर्मर घ्यायचे असेल तर स्वतः दीड ते दोन लाख रुपये भरावे लागणार आहे. हा आदेश सरकारने ताबडतोब मागे घेतला पाहिजे, काँग्रेस सरकार सत्तेवर येताच 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु एकाही मंत्र्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतीला व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हे दिसून येते तसेच हे सरकार अस्थिर झाले असून पाच वर्षे टिकणार नाही. अन्नभाग्य योजनेतून प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ देतो म्हणून घोषणा केली होती. परंतु अजून एक किलो तांदूळ सुद्धा दिले नाहीत. तसेच प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये देतो म्हणून सरकारने जाहीर केले होते. परंतु अर्ध्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत तर अर्ध्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले नाहीत. तसेच नोकरी नसलेल्यांना महिन्याला बेरोजगार भत्ता म्हणून तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात घालण्यात येतील असे जाहीर केले होते. परंतु त्यांच्या खात्यावर एक रुपया सुद्धा घालण्यात आला नाही फक्त घोषणाच करण्यात आली. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर 10 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढून सरकारच्या विरोधात निदर्शने करून सरकारच्या विरोधात निवेदन देण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेळगाव येथे 10 नोव्हेंबर रोजी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातून शेतकरी व नागरिकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी सर्वांनी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हजर राहावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय कुबल, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगरचे एमडी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील, श्रीकांत इटगी, बसू सानीकोप, प्रदीप सानिकोप, राजू सिद्धांनी तसेच भाजपाचे कार्यकर्ते व नेते मंडळी उपस्थित होते.