खानापूर : निपाणी बस स्थानकातून बेळगाव प्रवास करून पुढील प्रवासासाठी अळणावर बसमध्ये चढत असताना खानापूर येथील महिलेच्या पर्समधील चार तोळ्याचे दागिने लंपास केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खानापूर येथील प्रतिभा मंजुनाथ सक्री नामक महिला बेळगाव येथून अळणावर बसने खानापूरला प्रवास करीत होती त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी सदर महिलेच्या पर्समधून चार तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मात्र सदर घटना महिलेच्या खानापूर येथील घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. प्रतिभा सक्री यांनी खानापूर पोलिस स्टेशन गाठले मात्र खानापूर पोलिसांनी तुम्ही बेळगाव येथील मार्केट पोलीस स्थानकात तक्रार नोंद करा असे सांगितले तर मार्केट पोलिसांनी चोरीचा प्रकार खानापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडल्यामुळे खानापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंद करा असे सांगितले. त्यामुळे सक्री कुटुंबीयांना चोरी झालेला मनस्ताप बरोबरच पोलिसांच्या या वागण्याचा देखील नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.
कर्नाटक सरकारच्या मोफत बस योजनेचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर व खिसेकापुंचा मुक्त संचार बस स्थानकावर वाढलेला आहे.
सदर घटनेची नोंद दोन दिवसानंतर खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.