खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यामध्ये असणार्या सीमाप्रश्नाला बळकटी येण्यासाठी समस्त मराठी बंधू भगिनींने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सीमा महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केले आहे.
यासाठी आज रोजी नंदगड येथे महामेळाव्याची जनजागृती करण्यासाठी सीमासत्याग्रही म. ए. समितीचे माजी अध्यक्ष श्री. पुंडलिकराव चव्हाण, म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर पाटील, सहचिटणीस रणजीत पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य श्री. गोपाळराव पाटील, भुविकास बॅंकेचे संचालक श्री. नारायण नागाप्पा पाटील, म. ए. समितीचे खजिनदार श्री. संजीव पाटील, राजाराम देसाई, गंगाराम पाटील आणि इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित राहून नंदगडच्या आठवडी बाजारात महामेळाव्याची पत्रके वाटण्यात आली. यावेळी महामेळावा यशस्वी करण्यासाठी सीमातपस्वी पुंडलिकराव चव्हाण यांनी आपल्या नंदगड विभागातुन बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित राहून महामेळावा यशस्वी करतील अशी त्यांनी ग्वाही दिली.