खानापूर : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो बेळगांव येथे सोमवार दिनांक ४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भव्य सीमा महामेळाव्याचे आयोजन केले आहे. इसवीसन २००६ पासून आजपर्यंत कर्नाटक शासनाने हिवाळी अधिवेशन बेळगांवमध्ये भरवून मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यामध्ये असणार्या सीमाप्रश्नाला बळकटी येण्यासाठी समस्त मराठी बंधू भगिनींने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सीमा महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने केले आहे. यासाठी आज रोजी खानापूर येथे महामेळाव्याची जनजागृती करण्यासाठी म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, समितीचे माजी अध्यक्ष देवाप्पा गुरव, गर्लगुंजी विभागाचे उपाध्यक्ष कृष्णा कुंभार, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत, लोंढा विभाग उपाध्यक्ष कृष्णा मन्नोळकर, समिती नेते प्रकाश चव्हाण, पुंडलिक पाटील, भीमसेन करंबळकर, विवेकानंद पाटील, एन. जे. गुरव, तुळजाराम गुरव, टोपाण्णा कालमणकर, राजेंद्र कुलम, राजाराम देसाई, म्हात्रू धबाले आणि इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष श्री. देवाप्पा गुरव यांनी उद्याचा महामेळावा यशस्वी करून आम्हा मराठी भाषिकांना कर्नाटकाच्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची आहे आणि महाराष्ट्रात सामील होऊन हा सीमाप्रश्न लवकरात लवकर सुटावा अशी भावना व्यक्त केली. या समयी सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी सर्व मराठी भाषिकांना आवाहन केले की, उद्याच्या महामेळाव्याला आपल्या वाहनांनी सकाळी ११ वाजता व्हॅक्सिन डेपो येथे हजर रहावे. यावेळी महामेळाव्याची जनजागृती करण्यासाठी खानापूर शहरात पत्रके वाटण्यात आली.