खानापूर : कार्यसम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांना त्यांच्या केलेल्या कार्याबद्दल व त्यांच्याकडे असलेल्या संघटित वृत्तीचा विचार करून पक्षाने त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच खानापूर तालुक्याला उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे मराठीचा बुलंद आवाज लोकसभेत पाठविण्याची संधी खानापूरवासियांना मिळाली आहे. विकासाच्या भुलथापांना बळी न पडता अंजलीताई निंबाळकर यांना बहुमताने निवडून द्या, असे आवाहन ब्लॉक काँग्रेस माजी अध्यक्ष ऍड. ईश्वर घाडी यांनी केले.
चापगावमधील कोपरा सभेत बोलताना ते म्हणाले की, बेगडी हिंदुत्व आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला त्यांची योग्य ती जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. मराठा समाजाने खते आणि बियाणांवर जीएसटी लावून शेतकऱ्यांवर अन्याय करत कर्जबुडव्यांना हजारो कोटींची कर्जमाफी देणाऱ्या तसेच संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या या सरकारला सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आलेली आहे, असे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
डॉ. अंजलीताई निंबाळकर म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीतील चुकीची पुनरावृत्ती पुन्हा करू नका. धर्म आणि स्वतःच्या नेत्यांच्या नावावर मते मागणाऱ्यांकडे आधी हिशोब विचारा. नळाला पाणी, घरासमोरचा रस्ता, गावची शाळा यांच्या विकासासाठी काँग्रेसच काम करू शकते. काँग्रेस हा तळागाळातील जनतेला सामावून घेणारा पक्ष आहे. भाजप नेते जातीयवाद आणि मोदींच्या नावावर मते मागतात ही त्यांची अपयशाची साक्ष आहे. भाजप शेतकऱ्यांवर बेगडी प्रेम दाखवत आले आहे. दुष्काळात कष्टकऱ्यांना दिलासा देणारी रोहयो योजना ही काँग्रेसची देण आहे हे कोणी विसरू नये, असे देखील त्या यावेळी म्हणाल्या. पाच वर्षातून एकदा मते मागण्यासाठी येणाऱ्यांना कायमचे घरी बसविण्याचे आव्हान देखील यावेळी केले. प्रचाराला महिला व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जानकप्पा पाटील, शिवराम पाटील, महादेव पाटील, सावित्री मादार, महादेव कोळी, वैष्णवी पाटील, जोतिबा शिवणगेकर, प्रसाद पाटील, मधु कवळेकर, नजीर सनदी, नागराज येळूरकर आदी उपस्थित होते.