खानापूर : आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देणारे केंद्र सरकार पूर्णतः शेतकरी विरोधी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचे काम केले. ज्यांना शेतकऱ्यांच्या घामाची कदर नाही अशा शेतकरी विरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले.
डॉ. निंबाळकर यांनी रविवारी (दि. २१) काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह तालुक्याच्या पूर्व भागातील तोलगी, गंदीगवाड, कक्केरी, करंबळ, सुरपूर-केरवाड या भागात घरोघरी प्रचार केला.
प्रचारादरम्यान बोलताना त्या म्हणाल्या की, पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी पाच वर्षात सातत्याने पाठपुरावा केला. तथापि भाजप सरकारची अनास्था आड आली. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न बारकाईने अभ्यासले असून पाणीपुरवठा योजनांची कार्यवाही केल्यास बळीराजाच्या घरी समृद्धी नांदण्यास वेळ लागणार नाही. खासदार म्हणून शेतकऱ्याला स्वाभिमानी व स्वावलंबी बनविण्याचा आराखडा तयार असल्याचे सांगितले.
शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पिकांना योग्य किंमत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी केंद्रात काँग्रेसचे सरकार आणण्याची विनंती केली. सिंचन योजनांच्या अभावामुळे सुपीक जमीन असूनही पूर्व भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य दाम मिळत नाही. आमदारकीच्या काळात अनेक महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आता पूर्व भागात हरित क्रांती घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतिनिधी म्हणून एकदा संसदेत पाठवा, अशी साद कारवार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी घातली.
रमेशगौडा पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा विडा उचलला आहे. कृषी अवजारे, खत आणि बियाणे यावर जीएसटी लावून दुष्काळात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून तालुक्यातील बळीराजा डॉ. निंबाळकर यांच्याच पाठीशी खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लिंगनमठ ग्रा. पं. अध्यक्ष कासीम हट्टिहोळी, रमेश पाटील, बसनगौडा पाटील, देमाण्णा बसरीकट्टी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, राजू तळवार, अदृश्य दुडप्पनवर, कल्लापा रंगन्नवर, भरतेश तोरोजी, महावीर हुलीकवी, अन्वर बागवान, गंगाधर गंदिगवाड आदी उपस्थित होते.