बेळगाव : हुबळी येथील एका खाजगी महाविद्यालयातील तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आंदोलने छेडण्यात येत असून, या घटनेचे पडसाद आता बेळगाव पर्यंत पसरले आहे. हुबळीत झालेल्या खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी बेळगावमध्ये विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले.
हुबळी येथील युवतीचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे सत्ताधारी गटातील मंत्र्यांनी सांगितले. मात्र विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत, या घटनेमागे एकाच व्यक्तीचा हात नसून आणखी काही जणांचा किंवा गटांचा समावेश असल्याचा आरोप केला आहे. शिवाय, या प्रकरणात सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत, आरोपीला संरक्षण देत असल्याचा आरोपही केला आहे.
सोमवारी बेळगावमध्ये छेडण्यात आलेल्या आंदोलनात, बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावीत. अन्यथा संघटनांच्या ताब्यात द्यावेत. किंवा, आरोपीचा एन्काऊंटर करावा. अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. नेहा हिरेमठ सारख्या अनेक तरुणींचे जीव, आज धोक्यात आहेत. महिलांना राज्यात संरक्षण नाही. यासारखे आरोप करत राज्य सरकारवर ताशेरे ही ओढण्यात आले.