Friday , September 20 2024
Breaking News

माजी महापौरांचा महाप्रचार आणि समितीचा घातला आचार…

Spread the love

 

महाराष्ट्र एकीकरण समितीचा बट्याबोळ करायचा विडाच जणू काही लोकांनी उचललेला दिसतो. मराठी माणसाचा घात मराठी माणूसच करू शकतो हेच खरे. एवढी वर्ष गटतट म्हणून समितीचा उद्धार करणाऱ्या लोकांनी आता उघड उघड राष्ट्रीय पक्षांचे जोडे उचलण्याची सपारीच घेतली आहे. एरवी समितीसाठी किती काम करतो, आपण मराठी कसे, समितीनिष्ठ कसे हे दाखविण्यात अग्रेसर असणारे निवडणुका आल्या की राष्ट्रीय पक्ष कसे जवळेचे आहेत हे दाखवतात आणि त्यांची गुलामी करू लागतात. निवडणुका संपल्या की पुन्हा समिती म्हणून मिरवू लागतात. आत्तापर्यंत या गोष्टी पडद्याआड सुरू होत्या पण आता उघडपणे सुरू झाल्या आहेत. सिमालढ्यासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाने एकत्र यावे यासाठी जनता अतोनात हाल सोसत असताना ज्यांच्या हातात नेतृत्व दिलं, ज्यांना समितीच्या नावावर निवडून दिले असे लोक मात्र मिळालेल्या पद प्रतिष्ठेचा मान सगळा अश्या लोकांच्या चरणी अर्पण करत आहेत ज्यांनी आपल्या चरणाखाली मराठी चिरडून टाकली.
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून अनेकांची धुसफूस दिसू लागली होती. मतेमतांतरे समोर येत होती. अश्यात समितीच्या जीवावर महापौरपद भोगलेल्या एकाने उघडपणे भाजपाच्या उमेदवार निवडीमध्ये आघाडी घेताना दिसली. एवढी वर्ष समितीचा अधिकृत उमेदवार पाडविण्यासाठी प्रयत्न केले नंतर भाजपवारी करून झाली. पुन्हा उपरती झाल्याचे भासवून समितीमध्ये सामील झाले. मराठी माणूस संघटित होईल या अपेक्षेने लोकांनी स्वागत केले. पण हा सगळा खटाटोप उमेदवारीसाठी होता की काय असे विधानसभा निवडणुकीच्या वेळी उघडपणे दिसून आले. पण त्यातून देखील सावरत असताना आता पुन्हा एकदा त्यांनी उघडपणे जाहिरच केले की भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे. ज्या पक्षाने सीमाभागातील मराठी जनतेचे अतोनात हाल केले. भगव्याचा अपमान केला, ज्यांनी बेळगावचे नामांतर घडवून आणले आज त्याच पक्षाच्या उमेदवारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. हीच निष्ठा समितीसाठी किंवा लढ्यासाठी दाखवली असती तर कदाचित तुम्ही देखील आमदार झाला असता… नुसतं महाराजांच्या नावाने राजकारण करून चालत नाही त्यासाठी त्याग काय केला हे सुद्धा जनतेच्या न्यायालयात सिद्ध करावे लागते.
एकच माजी महापौरांचे हे असे वागणे आहे असे म्हणून चालत नाही आता आणखीन काही माजी महापौर यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या कर्तृत्वाचा आलेख उभा करत आहेत. कानडी लोकांनी राज्याच्या राजधानीत बेळगावच्या प्रथम नागरिकाला काळे फासले म्हणून सीमाभागात संतापाची लाट उसळली. लोकांनी तुम्हाला उचलून धरले. बेळगावची उमेदवारी देवून तुमचे नेतृत्व स्वीकारले पण पराभव झाल्यानंतर तुम्ही जे गेलात बाहेर ते थेट याच राष्ट्रीय पक्षाच्या कानडी उमेदवाराचा प्रचार करताना दिसला. मान्य आहे तुमच्या निवडणुकीदरम्यान काहींनी गद्दारी केली. तुमचा पराभव केला त्यासाठी तुम्ही कायम समितीच्या लोकांना दूषणे देत लढ्यातून काढता पाय घेत वृद्धांच्या पायाखाली सेवा करत बसला पण आज तुमच्या कृत्याने तुम्ही सिद्ध केले की तुमची भूमिका देखील स्वर्थीच होती. भलेही ज्या मतदारसंघात समितीचा उमेदवार नाही त्या ठिकाणी तुम्ही प्रचारात आघाडी घेतली असली तरी तुम्ही कुणाचा प्रचार करत आहात याचे तरी भान ठेवावे आणि तुमची ही व्यक्ती निष्ठा समितीसाठी कधी दिसली नाही?? ज्या समितीने तुम्हाला ओळख दिली त्या समितीसाठी तुम्ही इतक्या वर्षात कधी राबताना दिसला नाही. त्यावेळी तुमच्या समाजकार्याची ढाल करून तुम्ही पळ काढत होता मग आता कोणता स्वार्थ आडवा आला ज्यासाठी तुम्ही थेट गोकाककरांचे पाय धरला? मेरू मणी तर पुढे आहेत. याच गोकाकवाल्यांशी जुळवून घेणारे सगळ्यात पहिले पुढे असणारे आणखीन एक माजी महापौर हे देखील आता उघडपणे राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहेत. एरवी नावाला समिती सोबत असल्याचे भासवून इतर वेळी मात्र कामे करून घेण्याच्या बहाण्याने त्यांनी गोकाककरांची पालखीचं खांद्यावर घेतली आहे. आणि यांचा आधार घेवून त्या पालखीला मुजरा करणारे जे अजून पडद्याआड आहेत ते देखील कधी न कधी उघडे पडतील यात शंका नाही.
एकीकडे समितीच्या बेळगाव लोकसभा उमेदवाराला पाठिंबा देवून समितीनिष्ठ असल्याचे भासवून इथल्या प्रचारातून काढता पाय घेत चिक्कोडीमध्ये मात्र राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारासाठी पायपीट करत आहेत. समितीला लागलेली असली वाळवी कश्यामुळे आहे याची प्रत्येकाची कारणे आहेतच पण समितीवर बोट ठेवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाचे माजी नगरसेवक पण स्वतःच्या पक्षाशी गद्दारी करून काँग्रेस प्रचारात या महापौरांच्या जोडीला दिसत आहेत. साथीला आणखीन एक समिती हितचिंतक असणारे समाजसेवक आहेतच…

या सगळ्या प्रकारात सामान्य लढ्याशी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता मात्र आता पुरता हरला आहे. त्या सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची विटंबनाच सुरू आहे हे मात्र नक्की. या जाहीरपणे समिती विरोधकांचा प्रचार करणाऱ्या लोकांचा समाचार तर येणाऱ्या काळात जनता घेईलच पण त्या लोकांचा सुद्धा हिशेब होईल ज्यांनी समिती सोबत असल्याचे भासवून आतून मतांचा हिशेब केला आहे. एक काळ होता जेव्हा असे व्यवहार दाबून जात होते पण आता भिंतीला पण कान, डोळे आहेत आणि अश्या व्यवहाराच्या चर्चा बाहेर येत आहेत. मांजर कितीही डोळे झाकून दूध पीत असले तरी ये पब्लिक है ये सब जानती है.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार

Spread the love  बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *