नवी दिल्ली : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ५०वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने आले होते. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने भुवनेश्वर कुमारच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर एका धावेने शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान समोर विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात राजस्थान संघाने यशस्वी-रियानच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ७ बाद २०० धावाच करु शकला.
राजस्थानचा एका धावेने निसटता विजय
हैदराबादने दिलेल्या २०२ लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली कारण संघाने एक धावेवर जोस बटलर (०) आणि कर्णधार संजू सॅमसनचे (०) विकेट गमावले. यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील १३३ धावांच्या भागीदारीने आरआरला विजयाच्या जवळ आणले होते, तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही. राजस्थानला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, पण भुवनेश्वरने रोव्हमन पॉवेलला (२७) बाद करून हैदराबादला विजय मिळवून दिला.
भुवनेश्वर कुमारची निर्णायक गोलंदाजी
या सामन्यात भुवनेश्वर कुमारने तीन विकेट घेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तत्पुर्वी यशस्वी जैस्वालने ४० चेंडूत ६७ धावा केल्या, ज्यात त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. रियान परागने ४९ चेंडूत ७७ धावांची शानदार खेळी खेळली, ज्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार ठोकले. या विजयासह हैदराबादने दोन महत्त्वाचे गुण घेतले, तर राजस्थानची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची प्रतीक्षा वाढली.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि आवेश खानने अभिषेक शर्माला बाद करून राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. पुढच्याच षटकात अनमोलप्रीत सिंग संदीप शर्माचा बळी ठरला, त्यामुळे हैदराबादवर दबाव वाढला. पॉवरप्लेमध्ये हैदराबादची फलंदाजी मंदावली आणि हैदराबादने पॉवरप्लेमध्ये या हंगामात सर्वात कमी धावसंख्या उभारली.
पॉवरप्लेमध्ये हैदराबाद संघाला दोन विकेट्सवर केवळ ३७ धावा करता आल्या. मात्र, नितीश रेड्डीसह हेडने डावाला गती दिली आणि दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावा जोडून हैदराबादची सामन्यात वापसी केली. दरम्यान, हेडने या हंगमातील चौथे अर्धशतकही झळकावले. मात्र, आवेश खानने हेडला क्लीन बोल्ड करत डाव संपवला.
नितीश रेड्डीचे वादळी अर्धशतक
हेड बाद झाल्यानंतर नितीश रेड्डीने आपला गियर बदलला आणि आक्रमक फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या टोकाला असलेल्या हेनरिक क्लासेनची चांगली साथ लाभली. जो मोठे फटके मारत राहिला. हैदराबादने पहिल्या १० षटकात ७५ धावा केल्या होत्या, परंतु हेड, नितीश आणि क्लासेनच्या स्फोटक खेळीमुळे हैदराबादने पुढील ६० चेंडूत १२६ धावा केल्या आणि फक्त एक विकेट गमावली. या काळात क्लासेन आणि नितीश यांच्यात चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाली. फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या सामन्यात चांगलाच महागडा ठरला आणि त्याने चार षटकांच्या स्पेलमध्ये ६२ धावा दिल्या.