Saturday , August 8 2026
Breaking News

भारत सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता; अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा

Spread the love

 

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला.

जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 159 धावांवरच आटोपला आणि भारताने 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.

सॅमसन-अभिषेक-ईशानचं वादळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या या सामन्यात टीम इंडियाने 20 षटकांत पाच बाद 255 धावांची मजल मारली. सलामीच्या संजू सॅमसननं सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेलं वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं. त्याने 46 चेंडूंत पाच चौकार आणि आठ षटकारांसह 89 धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 98 धावांची आणि ईशान किशनच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी रचली.

भारताच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करून न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या चिंधड्या उडवल्या. त्यामुळंच भारतीय डावाच्या आठव्या षटकात शतक आणि 15व्या षटकात द्विशतक धावफलकावर लागलं. पण जेम्स नीशामनं 16व्या षटकांत तीन फलंदाजांना माघारी धाडून भारताच्या डावाला ब्रेक लावला.

त्याआधी, अभिषेक शर्मानं 21 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 52 धावांची, तर ईशान किशननं 25 चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांसह 54 धावांची खेळी केली. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी मोठे फटके खेळून भारताला पाच बाद 255 धावांचा पल्ला गाठून दिला.

जसप्रीत बुमराह अन् अक्षर पटेलने न्यूझीलंडला गुंडाळलं

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात मात्र अत्यंत खराब झाली. भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी अचूक आणि घातक गोलंदाजी करत किवी फलंदाजांना बांधून ठेवले. नियमित अंतराने विकेट्स घेत भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. दबावाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी संपूर्ण संघ 159 धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने हा सामना 96 धावांनी जिंकला.

About Belgaum Varta

Check Also

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड, शुभमन गिलचा पत्ता कट

Spread the love  मुंबई : टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *