


मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडिओ शेअर करत त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
रहाणेने आपल्या पोस्टमध्ये, “कॅप 278 आता निरोप घेत आहे. इतकी वर्षे दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद. तुमचा मी कायम ऋणी राहीन,” असे लिहित चाहत्यांचे आभार मानले.
अजिंक्य रहाणेने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 5,077 धावा करत 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोच्च खेळी 188 धावांची राहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 2,962 धावा करत 3 शतके आणि 24 अर्धशतके केली, तर टी-20 क्रिकेटमध्ये 375 धावा केल्या.
रहाणेने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळला होता. त्याआधी त्याचा शेवटचा वनडे सामना 2018 मध्ये, तर शेवटचा टी-20 सामना 2016 मध्ये झाला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अजिंक्य रहाणेने अनेक संस्मरणीय खेळी करत भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान दिले. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका महत्त्वाच्या पर्वाचा शेवट झाला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta