
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील मारीहाळ गावात सुमारे 15 वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा महोत्सव होणार आहे. यात्रा यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या दृष्टीने मतदारसंघाच्या आमदार तथा माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी यात्रा कमिटीचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रमुख नेत्यांसोबत पूर्वतयारी बैठक घेतली.
मारीहाळ येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अनेक वर्षांनंतर होत असल्याने ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून, भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि विविध व्यवस्था करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मंदिराच्या विकासकामांसह यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या विविध कामांवर प्रामुख्याने चर्चा झाली. मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे, भाविकांसाठी सुविधाजनक वातावरण निर्माण करणे तसेच यात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली.
यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांना सुलभ आणि जलद दर्शनाची सुविधा, रांगेची योग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वाहनतळ, स्वच्छता तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होणार असल्याने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. भाविकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी योग्य वाहतूक नियोजन करणे, आवश्यक ठिकाणी बॅरिकेड्स उभारणे तसेच आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
याशिवाय यात्रेच्या पार्श्वभूमीवर मारीहाळ गावातील आवश्यक रस्ते विकास, गटार बांधकाम व दुरुस्ती, पथदिवे बसविणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधांवर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
अनेक वर्षांनंतर होणारी ही यात्रा गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला अधिक बळकटी देण्याबरोबरच ग्रामस्थ आणि भाविकांना एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण उत्सव ठरणार आहे. त्यामुळे यात्रा कोणत्याही त्रुटींविना आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी, स्थानिक नेते आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली.
यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, भाविकांना चांगल्या सुविधा आणि समाधानकारक अनुभव मिळावा यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीला विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी, मारीहाळ गावातील ज्येष्ठ नागरिक, यात्रा कमिटीचे सदस्य, काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta