खानापूर : राष्ट्रीय पक्ष लोकांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र यापासून दूर राहात मराठी भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी युवकांनी समितीच्या पाठीशी उभे राहुन आपली अस्मिता दाखवावी असे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी केले आहे.
समिती उमेदवाराच्या प्रचारासाठी मंगळवारी शिरोली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी बाबुराव गुरव होते. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सरदेसाई यांनी काँग्रेस किंवा भाजपचा उमेदवार खानापूर तालुक्यातील नसून फक्त समितीने खानापूर तालुक्यातील भूमिपुत्राला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खरा भूमिपुत्र कोण हे मराठी भाषिकानी जाणून घेत आपल्या भाषेच्या रक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी समिती सोबत राहणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात खानापूर तालुक्यात युवकांना उद्योगधंद्यांच्या माध्यमातून रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील याचबरोबर नवीन उद्योगधंदे सुरू व्हावेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यामुळे समितीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन पुन्हा एकदा आपली ताकद निर्माण करूया असे मत व्यक्त केले.
समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षात गेलेल्यांकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी पुढे येत सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन घेण्यासाठी संघटीतपने समिती उमेदवाराला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्या असे आसे आवाहन केले.
यावेळी विक्रम देसाई, कृष्णा गुरव, माजी लुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, खानापूर समितीचे उपाध्यक्ष रमेश धबाले आदींनी मनोगत व्यक्त करताना समितीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी दिनकर देसाई, अशोक अय्यर, नारायण गावकर, रामचंद्र देसाई, प्रमोद देसाई, संदेश कोडचवाडकर यांच्यासह महिला व ग्रामस्थ बैठकीला उपस्थित होते