खानापूर : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी धर्मवीर संभाजी उद्यान मैदानात जाहिर सभा होणार आहे. या सभेची सोशल मीडियावर जागृती केल्यामुळे समिती कार्यकर्ते सचिन केळवेकर आणि त्यांच्या भावावर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर खानापूर तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने निषेध नोंदविला आहे.
तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सीमा भागामध्ये मराठा समाज व मराठी भाषकांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याने राष्ट्रीय पक्षांना पोटशूळ उठला आहे. मराठा समाज एकवटला नुकसान होइल अशी भीती असल्याने समितीच्या कार्यकर्त्यावर भ्याड हल्ला करण्यात आला आहे. मात्र मराठी भाषिकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर समिती स्वस्थ बसणार नाही असे मत व्यक्त केले.
खानापूर समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी समिती गेल्या अनेक वर्षांपासून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. बेळगाव खानापूर किंवा इतर ठिकाणी आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत असताना समिती नेहमीच संयम बाळगत असते. मात्र समितीच्या सहनशीलतेचा अंत कोणीही पाहू नये. अंगावर आला तर शिंगावर घेण्याची मराठ्यांची परंपरा आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू नये. केळवेकर यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा खानापूर समिती जाहीर निषेध करीत असून पोलिसांनी याबाबत निष्पक्षपणे चौकशी करून समाज घटकांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मराठी भाषिक स्वस्थ बसणार नाहीत असे मत व्यक्त केले.
कारवार लोकसभा मतदार संघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्यामुळे सोशल मीडियावर एखादी पोस्ट केल्यामुळे समितीच्या कार्यकर्त्याला त्रास देणे चुकीचे आहे. निवडणूक काळात अशा प्रकारचे प्रकार घडू नये याची दखल पोलिसांनी घ्यावी अशी मागणी केली.
माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, रमेश धबाले, संजीव पाटील, रणजित पाटील, सुनिल पाटील, अर्जुन देसाई, मुकुंद पाटील, संदेश कोडचवाडकर, नागेश भोसले, आदी यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta