खानापूर : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला मुसळधार पाऊस रविवारीही कायम होता. कणकुंबी, जांबोटी, भीमगड, लोंढा, नागरगाळी वनपरिक्षेत्रात नेहमीप्रमाणे पाऊस सुरू असून संततधार पावसामुळे अनेकांचे हाल झाले आहेत.
भीमगड अभयारण्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे भांडुरी भरला आहे. त्यामुळे देगाव-हेमाडगा आणि पाली-मेंडील गावांमधील रस्ता आणि पुलावरून अनेक फूट पाणी वाहत आहे. देगाव आणि मेंडील गावाकडे जाणारे एकमेव रस्ते जलमय झाले असून, रविवारी पहाटेपासून दोन्ही गावांचा संपर्क तुटला. म्हादई नदीला पूर आल्याने नेरसा-गवळी, आमगाव-चिकले, घोसे गावांचा रस्ता संपर्क तुटला आहे.
चापगाव येथील यल्लाप्पा मादार यांच्या घराची भिंत रविवारी कोसळली. यामुळे त्यांचे 50 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मष्णू अर्जुन सुतार, परशराम महादेव जिवाई, निलवा इराप्पा अंगडी आणि नागो कुराडे यांच्या घरांची पडझड झाली आहे याची दखल ग्रामपंचायत पीडीओ व तलाठी यांनी ताबडतोब पंचनामा करून शासन दरबारी पाठवून देण्याची खबरदारी घ्यावी, असे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष रमेश धबाले यांनी ग्रामपंचायतींना विनंती केली आहे.
गवळी, आमगाव, कृष्णपुर, हुलंदा, सडा, देगाव गावांना जोडणाऱ्या पुलांवर पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. रविवारपर्यंत कणकुंबी येथे 8.4 सेमी, खानापूर शहर, लोंढा, गुंजी व जांबोटी येथे 5 सेमी, नागरगाळी, असोगा येथे सरासरी 6 सेमी आणि बिडी, कक्केरी येथे 2 सेमी पाऊस झाला आहे.
सिंधनूर-हेमडगा महामार्गावरील हालात्री पुलावरील पाण्याचा प्रवाह ओसरल्याने रविवारी पहाटेपासून या मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. लोंढा – वरकडा आणि सातनाळी-माचळी दरम्यानच्या खड्ड्यांवरील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. आमदार विठ्ठल हलगेकरांच्या सूचनेवरून विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.