खानापूर : खानापूर तालुक्यातील कृष्णापूर हे गाव तालुक्याच्या पश्चिम घाटात वसले आहे. गोवा सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. तर हेमाडगा पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. अवघ्या 30 ते 40 कुटुंबाचा समावेश असलेल्या या गावात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन जीवन जगणे देखील आव्हान बनले. एकीकडे खानापूर शहरात हायटेक बसस्थानक बनले आहे तर दुसरीकडे सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे. मात्र तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतेक गावे विकास तर दूरच मूलभूत सुविधांपासून देखील वंचित आहे. पावसाळ्यात तर या गावातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दुर्गम भागात घनदाट जंगलातून नदी, नाले ओलांडून वैद्यकीय सुविधा पोचणे दुरापास्त बनले आहे. कृष्णापूर गावातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी गोव्यात रोजंदारीवर अवलंबून आहेत. याच गावातील एक नागरिक सदानंद विष्णू नाईक हे आजाराने त्रस्त होते आणि गोव्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांचे पार्थिव कृष्णापूरला नेणे कठीण झाले. नातेवाईकांना सदानंद यांचा मृतदेह गावात नेताना तीन नद्या ओलांडून लाकडी अडीचा वापर करून प्रवास करावा लागला. स्थानिक लोकप्रतिनिधीनी आणि प्रशासनाने या दुर्गम भागातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी कृष्णापूर गावातील नागरिक करीत आहेत.