महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
खानापूर : मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी कधीही मागे पडत नाही. त्यामुळे मराठी भाषिकांनी आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राध्यान्य द्यावे. तसेच मराठी संस्कृती आणि भाषा टिकवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य पांडूरंग सावंत यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी खानापूर तालुक्यातील सरकारी मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी, सरकारी मराठी शाळा निडगल, सरकारी मराठी शाळा बरगाव आदी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंग सावंत यांनी गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने मराठी शाळांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आणि क्षेत्रात यशस्वी झाले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे होते तसेच त्यांची बौद्धिक क्षमता लहान असल्यापासूनच वाढत असते. त्यामुळे सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले तर पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातील मराठी शाळाना चांगले दिवस येणार आहेत. फक्त महाराष्ट्र एकीकरण समिती नव्हे तर प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
प्रारंभी गर्लगुंजी येथील मुलींच्या शाळेतील सहशिक्षक वाय. एम. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी युवा समितीतर्फे मराठी शाळांसाठी घेण्यात आलेला उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असून या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावावा असे मत केले.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य गोपाळ पाटील, खानापूर अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, मिलिंद देसाई आदींनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
यावेळी गर्लगुंजी पंचायतीचे माजी अध्यक्ष हणमंत मेलगे, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष तुळजाराम पाटील, व्यंकट कोलकार, पावनाप्पा पाटील, मुख्याध्यापिका एस वाय कोलकार, एस बी पाटील, एन बी पाटील, एस एस जकाती, एस एल हळदणकर, डी, एस गुरव, ए आर कांबळे, सरकारी मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका एस जे देसाई, के एन धामनेकर, याची एस जे कुंभार, एस पी चोपडे, जे पी सायनेकर यासह इतर उपस्थित होते.