खानापूर : अनेक जण वाढदिवसाचे औचित्य साधून पार्टी करण्यासह इतर कार्यक्रमाचे आयोजन करतात मात्र हलगा येथील ग्राम पंचायतीचे सदस्य रणजीत पाटील यांनी वाहन चालक आणि विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन रविवारी रस्त्याच्या डागडूजीचे काम हाती घेतले त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हलशी ते नागरगाळी रस्त्याची
दुरावस्था झाली असून हलगा व इतर गावाजवळ अधिक प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने वाहन चालकांसह शाळा महाविद्यालयांना ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील मोठी अडचण होत आहे. तसेच रस्त्याकडील चिखलामध्ये वाहन अडकून पडत आहेत. काही दिवसांपूर्वी ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, पुंडलिक पाटील, गर्लगुंजीचे समिती कार्यकर्ते सुनिल पाटील आदींनी खड्ड्यांची पाहणी करून रस्त्याची लवकर डागडुजी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले नाही त्यामुळे विद्यार्थी व वाहन चालकांना दररोज अडचणीचा सामना करावा लागत असल्याने पाटील यांनी आपल्या गावातील सहकारी व विद्यार्थ्यांना घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम फाशी घेतली होती. तसेच ट्रॅक्टरमधून चीपिंग व दगड आणून टाकीत गावाजवळील रस्त्याची डागडुजी केली आहे त्यामुळे काही भागातील समस्या दूर झाली आहे. मात्र संबंधित विभागाने मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.