खानापूर : जीवनाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धाला वाचवण्यात खानापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांना यश आले.
बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास खानापूर नगरपालिकेजवळील पुलावरील पायऱ्यांवरून मलप्रभा नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच शेडेगाळी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजू गुरव, रुमेवाडी येथील प्रभाकर सुतार, करंबळ येथील मारुती पाटील यांनी या वृद्धाची सुटका करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.
आत्महत्या करण्याचे कारण काय, असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी या वृद्धाला विचारला. तेव्हा त्या व्यक्तीने मी मास्तमर्डी (देवगिरी) येथील रहिवासी असून मला दोन मुले व तीन मुली असल्याचे सांगितले. मुलींचे लग्न झाले आहे. आता मी दोन मुलांसह आहे. पण, दोन्ही मुलांकडून माझी तब्येत ठीक नसल्याने माझा छळ केला जात आहे. याला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर खानापूर पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करून त्यांच्या मुलांशी संपर्क साधला. दोन्ही मुले खानापूरला पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात येणार असून, येत्या काही दिवसांत त्यांची योग्य काळजी घेण्याचा इशारा देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.