खानापूर : खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसह इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे त्यामुळे तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणे आवश्यक बनले आहे. तसेच अनेक प्राथमिक केंद्रातील डॉक्टरांवर दोन प्राथमिक केंद्रांचा भार देण्यात आला आहे त्यामुळे अनेक रुग्णांची मोठी अडचण होत आहे.
खानापूर तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत तसेच तालुक्याच्या अनेक भागात सरकारी आणि खाजगी रुग्णालयांची संख्या अतिशय कमी प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा खानापूर, नंदगड, बिडी या भागातील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागते. महाराष्ट्र एकीकरण समितीसह नागरिकांनी अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी यासाठी निवेदन दिले आहे. तसेच तालुका आणि जिल्हा आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत आग्रही मागणी केली आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्यासह सध्या सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा भार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हलशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांवर गणेबैल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी योग्य प्रकारे उपचार मिळत नसण्याचे अनेक तक्रारी वाढत आहे. याची दखल घेऊन तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी तसेच आरोग्य केंद्रांना आवश्यक सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.
………………………………………………………………..
प्रतिक्रिया
खानापूर तालुक्यातील विवीध समस्यांबाबत महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सातत्याने आवाज उठविला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर एक ते दोन केंद्रांचा भार देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबत लवकरच आवाज उठवला जाईल प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करू नये.
– रणजीत पाटील, सदस्य हलगा ग्राम पंचायत.