खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा या मागणीसाठी सर्व पक्षीयांच्या वतीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी गणेबैल टोल नाक्यावर रास्ता रोको करून धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले होते.
सकाळी 11.30 ते दुपारी 1.00 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. खानापूर पोलिसांनी आंदोलन न करण्यासाठी आंदोलनकर्त्यावर प्रथम दबाव आणला. मात्र शेवटी आंदोलन करण्यात आले. यावेळी खानापूरचे उपतहसीलदार राकेश बुवा व कलाप्पा कोलकार यांनी निवेदनाचा स्वीकार करून येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये मागण्यांची व कागदपत्रांची पूर्तता करून माहिती देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जर याबाबत तोडगा निघाला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलनस्थळी म. ए. समितीचे नेते व तालुका पंचायतीचे माजी सदस्य पांडूरंग सावंत म्हणाले की, गणेबैल टोलनाक्यावर शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या शेतकऱ्यांची अजून नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच रस्त्याचे काम सुध्दा अर्धवट असताना टोल आकारणी करणे हे अन्यायकारक आहे. त्यासाठी तातडीने टोल बंद करण्यात यावा.
माजी सैनिकाची टोल व्यवस्थापकाविरोधात तक्रार
यावेळी माजी सैनिक नारायण जुंझवाडकर यांनी गणेबैल टोल नाक्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध तक्रार केली. यावेळी त्यांनी भारतीय सैनिकांना संपूर्ण देशात टोल माफी असतानासुद्धा या टोलनाक्यावर भारतीय सैनिकांना टोल आकारणी केली जाते. तसेच सैनिकांना उद्धट उत्तर देण्यात येत आहेत ते तात्काळ थांबवावे असे सांगितले.
आंदोलनस्थळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी भेट देऊन म्हणाले की, शुक्रवारी निपाणी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असून, आमदार विठ्ठलराव हलगेकर व भाजपचे इतर पदाधिकारी नितीन गडकरी यांची भेट घेऊन गणेबैल टोलनाक्याबाबत निवेदन देणार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत, तसेच स्थानिकांना टोल माफी देण्याबाबत व इतर विषयावर प्रत्यक्ष भेटून चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, तसेच याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आंदोलन स्थळी म. ए. समितीचे गोपाळ पाटील, कृष्णा कुंभार, चांगप्पा बाचोळकर, परशुराम बाचोळकर, उदय पाटील, राजू पाखरे, गोविंद जाधव, पुंडलिक पाटील, पुंडलिक पाटील करंबळ, तसेच इदलहोंड, गर्लगुंजी, गणेबैल, निट्टूर व खानापुरातील शेतकरी, व माजी सैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.