खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूर शहराला लागून असलेल्या शिवाजीनगर रेल्वे पुलावर दोन दुचाकींचा अपघात होऊन यामध्ये एक जागीच ठार झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, नागुर्डा येथील अमोल खोबान्ना पाखरे (वय 27) हा युवक आपल्या होंडा शाइन दुचाकीवरून आपल्या गावाकडे जात होता. तर रामगुरवाडीचा युवक शंकर धाकलु गुरव (वय 35) हा आपल्या दुचाकीवरून आपला काका रवळू गुरव (वय 65) यांच्यासह खानापूरकडे येत असताना शिवाजी नगर जवळील रेल्वे पुलावर दोन दुचाकींमध्ये अपघात घडला. यामध्ये रामगुरवाडी गावचा युवक शंकर धाकलु गुरव हा जागीच ठार झाला. तर त्याचा काका रवळू गुरव व नागुर्डा गावचा दुचाकीस्वार अमोल खोबान्ना पाखरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असल्याने त्यांच्यावर खानापूर येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून बेळगावला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अपघाताची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर, सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील, भाजपा युवा नेते पंडित ओगले यांनी सरकारी दवाखान्यात भेट देऊन मृत युवकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
Belgaum Varta Belgaum Varta