जांबोटी : कला-संस्कृती प्रतिष्ठान जांबोटी यांच्यावतीने रविवारी बेळगावचे प्रसिध्द गायक विनायक मोरे, मंजुश्री खोत, अक्षता मोरे, चैत्रा अध्यापक व स्वरा मोरे यांच्या “स्वरांजली” मराठी सुगमसंगीत कार्यक्रमाला उपस्थित रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. तीन तास रंगलेल्या या संगीत मैफलीत विविधढंगी बहारदार भावगीते, भक्तीगीते, अभंग, नाट्यगीते प्रस्तुत करून त्यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली.
ॐकार स्वरूपा, जय शारदे वागेश्वरी, सगुण निर्गुण, गगन सदन तेजोमय, माझी रेणुका माऊली, वैकुंठाहुनि आलो आम्ही, जय शंकरा, खेळ मांडीयेला, चांदणे शिंपीत जाशी, या जन्मावर, शतदा प्रेम करावे, रुपेरी वाळूत, लाजून हासणे, शुक्रतारा मंदवारा, नारायणा रमारमणा, सांज ये गोकुळी, वाट इथे स्वप्नातील, नारी नयन चकोरा, गर्द सभोवती रान साजणी, सखी मंद झाल्या तारका, संधीकाली या अशा, शूर आम्ही सरदार, ने मजसी ने परत मातृभूमीला या सदाबहार गीतांचे सुश्राव्यपणे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. त्यांना तबल्यावर संतोष पुरी, हार्मोनियमवर चैत्रा अद्यापक आणि सिंथेसायझरवर विनायक मोरे यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली. संतोष पुरी यांनी हार्मोनिका या वाद्यावर वाजविलेल्या ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ नाट्यगीताच्या अप्रतिम धूनने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
निवृत्त सुभेदार चंद्रकांत देसाई व सुभेदार पावनापा देसाई यांनी कार्यक्रम प्रायोजित केला. प्रारंभी वैष्णवी सडेकर यांच्या ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विज्ञान विकास मंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कल्लेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जांबोटी विद्यालयचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी कलाकारांची ओळख करून दिली. जांबोटीतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या दहावी व बारावीच्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन खास गौरविण्यात आले. ज्येष्ठ निवृत्त मुख्याध्यापक अर्जुन रामचंद्र कल्लेकर, नागोजी सडेकर, भाजपा नेत्या धनश्री सरदेसाई यांचा यावेळी खास सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जयराम देसाई, विठ्ठल देसाई, राजाराम देसाई, रत्नाकर देसाई, अनिल जांबळेकर, राजू गुंजीकर, रवळनाथ गुरव, हनुमंत देसाई, पांडुरंग गुरव आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक सुरेश कल्लेकर यांनी सूत्रसंचालन केले आणि बाळकृष्ण गुरव यांनी आभार मानले.