धारवाड : खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणण्यात येणार होता. पण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी अविश्वास ठरावाला आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्थगिती आदेश दिला असून आता पुढील सुनावणी दि. 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अविश्वास ठराव कायद्याच्या चौकटीत अडकल्यामुळे, अविश्वास ठरावाबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मेरडा गावचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य व कंत्राटदार महाबळेश्वर पाटील हे अनेक वर्षापासून ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. तसेच अनेक वर्षापासून त्यांनी अध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा पार पाडली आहे. आता सुद्धा ते हलगा ग्रामपंचायतचे विद्यमान अध्यक्ष आहेत. विरोधी गटाने यापूर्वी त्यांच्यावर अनेक वेळा आरोप, प्रत्यारोप केले आहेत. लोकायुक्त चौकशी करण्याची सुध्दा मागणी करण्यात आली होती. पण यामध्ये काहीही निष्पन्न झाले नसल्याचे समजते. मागील महिन्यात त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. व या अविश्वास ठरावावर शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार होते. परंतु उच्च न्यायालयाने सदर अविश्वास ठरावावर स्थगिती आदेश दिल्याने, हा अविश्वास ठराव बारगळला आहे. महाबळेश्वर पाटील, यांचा अध्यक्षपदाच्या कालावधीला अजून केवळ 8 महिने बाकी आहेत. त्यामुळे या अविश्वास ठरावावर न्यायालयात कधी निर्णय होणार.? हे पहावे लागणार आहे. मात्र, न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे, महाबळेश्वर पाटील यांना दिलासा मिळाला असून अविश्वास ठरावाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta