बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुका मोठा आहे. या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने शंभर कोटी रुपये विशेष अनुदान जाहीर करावे अशी मागणी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभेत बोलताना केली.
उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार हलगेकर पुढे म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनतेला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्येही प्रामुख्याने दुर्गम भागातील गावकऱ्यांना पाणी, वीज आणि मोबाईल सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे प्रत्येक वर्षी तालुक्यातील रस्ते खराब होतात. रस्ता सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अनुदानाची घोषणा केली होती. मात्र अद्यापही अनुदान मिळालेले नाही. खानापूर तालुक्यातील अरण्यक्षेत्रात राहणाऱ्या लोकांना प्रथम जागा देण्यात याव्या. त्यानंतर त्यांचे स्थलांतर करण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली. त्याचबरोबर नंदगड बिडी या गावांना नगरपंचायत दर्जा घोषित करण्यात यावा असेही आमदार हलगेकर यांनी यावेळी सांगितले.