खानापूर : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूर पोलिस स्थानकात आणण्यात आले होते. पण कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश उत्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक विकासकुमार विकास यांनी बजावला आहे.
गुरूवारी (ता.१९) रोजी हिरेबागेवाडी येथून भाजपचे विधान परिषद सदस्य सी. टी. रवी यांना खानापूरात आणले होते. तत्पूर्वी, खानापूर पोलिस स्थानकात आवश्यक बंदोबस्त ठेवण्याची सूचना पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना करण्यात आली होती. पण, नाईक यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्था हताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल मंजुनाथ नाईक यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. सी. टी. रवी यांना अटक झालेली असतानाही त्यांच्याशी मात्र नाईक हे सौजन्याने वागत असल्याचे त्या दिवशी सर्वच अधिकाऱ्यांनी पाहिले होते. त्यांना हे प्रकरण भोवले.