
खानापूर : मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा आज वर्धापन दिन तसेच स्त्री शिक्षणाची नांदी करणाऱ्या सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बहुजन समाजाच्या शिक्षणाची परवड थांबविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या शिक्षण संस्थेने खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून एक अभिनव क्रीडा उपक्रम हाती घेतला आहे. मराठा मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या कल्पनेतून साकार होणाऱ्या या उपक्रमाची पूर्व तयारी गेले दोन तीन महिने चालू असून या क्रीडा मेनियामध्ये खो -खो आणि कब्बडी सारख्या मेहनती खेळांना प्राधान्य देण्यात आले आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेली ही शिक्षण संस्था मन, मनगट आणि मेंदू भक्कम करून देश सेवेसाठी योगदान देण्यास प्रवृत्त करण्यात अग्रस्थानी राहीली आहे. शैक्षणिक प्रगती बरोबर आज या शिक्षण संस्थेचे खेळाडू राज्यस्तरीय व देश पातळीवर चमक दाखवत आहेत हीच प्रेरणा घेऊन सलग दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा संग्रामात बेळगाव जिल्ह्यातून विविध भागातून येणारे खेळाडू आपली प्रतिभा पणाला लावून आपली अंगभूत कौशल्य प्रदर्शित करणार आहेत.
सदर क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या हस्ते होणार असून दिनांक या क्रीडा स्पर्धा 3 जानेवारी व दि 5 जानेवारी 2025 अशा सलग दोन दिवस चालणार आहे. दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 9:30 वाजता या स्पर्धेचा प्रारंभ होत आहे.
खानापूर परिसरातील क्रीडाप्रेमीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवस रात्र चालणाऱ्या या मर्दानी खेळांचा आनंद लुटावा असे आवाहन खानापूर येथील संचालक मंडळाने केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta