खानापूर : ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूल यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. तुकाराम हणमंतराव साबळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डीसीपी सी. वाय. पाटील, डीएसपी श्री. हिरेगौडर, बेळगाव येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. रवी इचलकरंजी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात शाळेच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. दीपप्रज्वलन भैरू नवलकर, राजू चिखलकर, गजानन कंग्राळकर, डॉ.सुरज साबळे, परशराम सुतार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे उद्घाटन बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हात्रु नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सी.एस. कदम यांनी केले. डीसीपी सी. वाय. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात कोणत्याही परीक्षेसाठी आपण तत्पर असले पाहिजे. संघर्ष आणि चिकाटी यावरच आपले भविष्य उज्वल घडवे यश संपादन करता येते त्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. डीएसपी. श्री. हिरेगौडर यांनी प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही साधनांशिवाय आपल्याला कसं जगायचं त्याच्याबद्दल सुंदर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना आयएएस, आयपीएस, केपीएससी, एमपीएससी या परीक्षेच्या बदलाचे महत्त्व समजावून सांगितले. रवी इचलकरंजी यांनी खास ओलमणीच्या गावकऱ्यांकरिता मोफत हेल्थ कार्ड देण्याचे आश्वासन देऊन शाळा तसेच गावकऱ्यांसाठी नेहमी सदैव सोबत राहण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले. प्रारंभी पाहुण्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील इंडो तिबेटियन पोलीस फोर्स (ITBP) मध्ये दाखल झालेल्या पहिल्या मुलीचा सत्कार तसेच कर्नाटक राज्यात सीआयपीएफ (CIPF) मध्ये प्रथम आलेल्या नागेश राऊत याचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे मागील वर्षी दहावीत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विद्यार्थिनींचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी स्वरचित उमंग काव्यसंग्रहाचे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार म्हणून “उमंग” च्या धर्तीवर आधारित मराठी लोक परंपरेचा जागर या पारंपारिक गीत सोहळ्याचे अविष्कारचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देत सर्व रसिकांची मने जिंकली तसेच कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने करण्यात आली. न भूतो न भविष्यती असा देखणा सोहळा यावेळी गावकऱ्यांनी तसेच पंचक्रोशीतील विविध रसिक वर्गाने अनुभवला. त्यावेळी समस्त असमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषाने दणाणून निघाला. खऱ्या अर्थाने अतिशय उत्साहाने हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्गाने तसेच आजी-माजी विद्यार्थी संघटना व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक ए. जे. सावंत यांनी केले तर आभार एस. आय. काकतकर यांनी मानले.