खानापूर : हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे.
अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
तत्कालीन ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या हलगा येथील ग्राम पंचायत अध्यक्षांची निवडणुक गुरुवारी पार पडली. निवडणूक अधिकारी मंजुनाथ मनकावी यांनी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली यावेळी सुनील पाटील यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज भरला. अर्ज भरणा झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात आली. त्यानंतर एकच अर्ज दाखल झाल्यामुळे सुनील पाटील यांची बिन विरोध निवड झाली. निवडणूक प्रक्रियेवेळी ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील, पांडुरंग पाटील, मंदा फठाण, स्वाती पाटील, इंदिरा मेदार, नाजिया सनदी उपस्थित होत्या. तर तीन सदस्य गैरहजर राहिले.
हलगा येथील ग्राम पंचायत अध्यक्षा विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव काही दिवसांपूर्वी मंजूर झाला होता. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तारीख जाहीर करण्यात आली होती त्यामुळे अध्यक्ष कोण होणार तसेच निवडणूक होणार की बिनविरोध होणार याकडे हलगा ग्राम पंचायत क्षेत्रातील गावांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत क्षेत्राचा विकास रखडला आहे. त्यामुळे विकास कामाना प्राध्यान्य दिले जाणार असून नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
——————————————————————
तत्कालीन अध्यक्षानी सदस्यांना व ग्रामस्थांना विश्वासात न घेता आम्ही हाती घेतली होती. त्यामुळे अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर अध्यक्षपदी सुनील पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला इतर सदस्यांचे सहकार्य लाभले येणाऱ्या काळात एकत्र येऊन विकास केला जाईल.
– रणजीत पाटील, ग्राम पंचायत सदस्य