
खानापूर : सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलवरून नग्न फोटो असल्याचे सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने एक वृद्ध दाम्पत्य आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची धक्कादायक घटना खानापूर तालुक्यातील बिडी येथे घडली आहे.
वृद्ध रेल्वे निवृत्त कर्मचारी डिएगो नझरेथ (83) आणि त्यांची पत्नी पाविया नझरेथ (79) यांनी आत्महत्या केली. गेल्या महिन्याभरापासून हे दाम्पत्य सायबर गुन्हेगारांच्या त्रासाला कंटाळले होते. हे गुन्हेगार स्वतःला पोलिस असल्याचे भासवत होते आणि व्हिडिओ कॉलवरून “तुमचे नग्न फोटो आमच्याकडे आहेत, पैसे दिले नाहीत तर ते व्हायरल करू” अशी धमकी देत होते. दाम्पत्याने या ब्लॅकमेलर्सच्या खात्यात आधीच 6 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. तरीही गुन्हेगारांनी पुन्हा पैसे मागितले. अखेर या मानसिक त्रासाला कंटाळून पाविया यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येनंतर डिएगो यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून चाकूने गळा व हात कापून स्वतःचा अंत केला.
स्वयं-सहायता गटातील एका महिलेने हे मृतदेह पाहून पोलिसांना कळवले. नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta