
खानापूर : 1 जून 1986 च्या कन्नड शक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे समितीप्रेमी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केले.
30 मे रोजी झालेल्या खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई हे होते. प्रास्ताविक व स्वागत सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी यांनी केले.
बैठकीत म्हादई कळसा- भांडुरा प्रकल्पासंदर्भात 3 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्याला खानापूर तालुक्यातील जनतेने पाठिंबा देऊन मोठ्या संख्येने सामील व्हावे. त्याचबरोबर खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पीक व स्वसंरक्षणार्थ असलेल्या बंदुका निवडणुकीदरम्यान पोलीस स्टेशनला जमा करून घेतलेल्या आहेत त्या बंदुका अद्याप परत दिलेल्या नाहीत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे भेट देण्याची ठरले. खानापूर तालुक्यातील जांबोटी मलनाड भागात गिड्डी मिरचीचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जाते परंतु मान्सूनपूर्व अतिवृष्टीमुळे पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तरी शासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी असा ठराव यावेळी करण्यात आला. जांबोटी, कणकुंबी, शिरोली, नेरसा पंचायत भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे याकडे शासनाने लक्ष द्यावे तसेच स्वतःला मराठी भाषिक म्हणवून घेणारे काही राष्ट्रीय पक्षाचे नेते महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल अपप्रचार करत आहेत त्यांना वेळीच आवर करण्यासाठी समितीने त्यांना व्यासपीठावर सडेतोड उत्तर द्यावे. त्याचप्रमाणे संघटना बळकटीसाठी प्रयत्न करावेत, असा ठराव बैठकीत करण्यात आला.

बैठकीदरम्यान खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेचे नूतन चेअरमन श्री. अमृत शेलार, संचालक श्री. विठ्ठल गुरव, संचालक श्री. बाळासाहेब शेलार यांचा माजी आमदार श्री. दिगंबरराव पाटील व अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या हस्ते हार, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
बैठकीत ऍड. केशव कळ्ळेकर, माजी सभापती मारुतीराव परमेकर, राजाराम देसाई, नागेश भोसले, प्रकाश चव्हाण, रमेश धबाले, पांडुरंग सावंत, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, अमृत शेलार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अजित पाटील, खजिनदार संजीव पाटील, एन. एन. पावले, रवींद्र शिंदे, मर्याप्पा पाटील, कृष्णा मन्नोळकर, नारायण पाटील, मोहन गुरव, जयराम देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खजिनदार संजीव पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta